बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना विषाणू प्रसार नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोना रूग्णांसाठी बुलडाणा, शेगांव व खामगाव येथे तीन आयसोलेशन वार्ड स्थापन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सैलानी यात्रोला सोडण्यात आलेल्या विशेष बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सध्या सैलानी यात्रेत आलेल्या भाविकांना परत निघून जाण्यासाठी बसेस, खाजगी टॅक्सींची व्यवस्था करण्यात येत आहे. नवीन भाविक यात्रेत येवू नये, म्हणून जाणीव जागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बस स्थानक व जालना रेल्वे स्थानकावर सैलानी यात्रा स्थगीत झाल्याचे फलक लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, पाळीव प्राण्यांचीसुद्धा नागरिकांनी स्वच्छता ठेवावी. त्याबाबत विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यात सैलानीसोबतच अन्य कुठल्या यात्रा असतील, तर त्यासुद्धा रद्द करण्यात येणार आहे. शेजारील जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी यांनासुद्धा सैलानी यात्रा रद्द करण्यात आल्याबाबत पत्र देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात प्रचार- प्रसार करावयाचा आहे.
मौजे पिंपळगांव सराई ता. जि. बुलडाणा येथील सैलानी बाबा यात्रेमध्ये देशातील अनेक राज्यातून भाविक येतात. यात्रेत ८ ते १५ मार्च दरम्यान अंदाजे ३ ते ५ लाख भाविक व मानसिक रोगी येतात. तसेच सदर यात्रेमध्ये मानसिक आजारग्रस्त व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कोरोना विषाणू बाधीत रूग्ण जर यात्रेमध्ये आला, तर कोरोना विषाणूचा आजारग्रस्तांचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. सदर आजारावर अद्यापपर्यंत कुठलाही प्रतिबंधीत उपचार किंवा लस उपलब्ध नाही.
कोरोना विषाणूचा प्रचार थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खालील गोष्टी अवश्य पाळाव्यात. बाहेरून आल्यानंतर खालून- वरून व्यवस्थित हात हँण्डवाश अथवा साबणाने स्वच्छ धुवावे. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर हात, रूमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. त्यानंतर टिश्यू पेपरची व्यवस्थित पणे बंद कचराकुंडीत विल्हेवाट लावावी. शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे. पुर्ण शिजविलेले खाद्यपदार्थ खावे.
हे करू नये : अर्धवट शिजविलेले खाद्यपदार्थ खावू नये. ताप, खोकला आल्यास डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळाटाळ करू नये. कुठल्याही वस्तूच्या पृष्ठभागावरून लागलीच हात तोंडाला लावू नये. कुठेही थुंकू नये, नागरिकांनी घाबरून जावू नये. पाळीव प्राण्यांना अस्वच्छ ठेवू नये.