लंडन : वृत्तसंस्था । ब्रिटनचे प्रोफेसर अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली असल्याचा दावा केला आहे .
कोरोनानं संपूर्ण जगाला विळख्यात घेतल्यानंतर विषाणूची निर्मिती कशी झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यासाठी त्यांनी कोरोना विषाणूचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्याचा दावा त्यांनी आपल्या अहवालात केला आहे. विषाणू तयार केल्यानंतर आपलं काळं कृत्य लपवण्यासाठी चीननं रेट्रो इंजिनियरिंगचा वापर केला. हा विषाणू मानवनिर्मित नसून वटवाघुळातून पसरल्याचं भासवलं. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय विषाणू तयार होऊच शकत नाही असा दावा त्यांनी केला. चीनकडे यापूर्वीही अनेकदा संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं आहे.
कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णत: मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘गेन ऑफ फंक्शन’ या प्रकल्पात याची निर्मिती केली गेली आहे. चीनने गुहेतील वटवाघुळामधून कोरोनाचा बॅकबोन घेतले आणि त्यावर स्पाईक टाकत त्या विषाणूला अधिक घातक केलं. त्यामुळे त्या विषाणूत मानवी हस्तक्षेप असल्याचे काही गुणधर्म आढळून आले असल्याने तो लॅबमध्येच तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्हॅक्सिन निर्मितीसाठी अभ्यास करताना हा खुलासा झाला.
वुहान लॅबमधील माहिती जाणीवपूर्वक लपवली गेली आणि नंतर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या शास्त्रज्ञांनी यावर आवाज उचलला त्यांना एकतर गप्प केलं गेलं किंवा त्यांना गायब केलं. संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करायचे तेव्हा अनेक वैज्ञानिक जर्नलने नकार दिला. त्यामुळे चीनचं पितळ उघडं पडलं नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमनं जानेवारी महिन्यात वुहानचा दौरा केला होता. तेव्हा त्या टीमने कोरोनाची निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला होता.