मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी दिली आहे.
“राज्य सरकारने सध्या लावलेले कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी आणि दूर अंतरावर असल्याने प्रवास करुन केंद्रावर जाऊन लस घेणं लोकांसाठी जिकरीचं ठरत आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करुन 18 वर्षांवरील सर्वांना लवकर लस देण्यासाठी घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम हाती घेतली तर मोठ्या प्रमाणात कोरोनावर मात करता येऊ शकेल. याकामी सरकारी यंत्रणेबरोबरच, खासगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल”, असं पत्र पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.
‘अमेरिका, ब्रिटनसह इतर देशानेही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहिम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल.’
‘पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहिम राबवण्यात आली होती. याचधर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल. कोरोना महामारीने मानवजातीसमोरच गंभीर संकट उभे ठाकले असून दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले हे संक्रमण आता गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात पोहचले आहे. वर्षभरापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर, ऑक्सीजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरुळीत चालण्यात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे.’
या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे नाना पटोले मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले.