नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे. वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.
कंपन्यांना नीती आयोग सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या ग्रुपने कंपन्यांना करोना लसची निर्मिती, किंमत तसंच सरकार त्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकतं यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करताना देशात तीन लसींची चाचणी सुरु असल्याचं सांगितलं होतं. भारतात सध्या तीन कंपन्या लसीवर काम करत आहेत. या कंपन्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पार पाडण्यासाठी बराच अवधी असून तो पार पडल्यानंतर लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे.
=======