नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोनावरील लशीविषयीचे संशोधन व अन्य माहिती देण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. या पोर्टलवर कोणालाही कोरोनाविषयक लशींचे संशोधन व विकास; वैद्यकीय चाचणी आदींबाबत माहिती घेता येईल. vaccine.icmr.org.in असा या पोर्टलचा पत्ता आहे. ‘देशामध्ये देण्यात येणाऱ्या अन्य लसीकरणांविषयीही या पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे,’
कोरोनावरील पहिली लस पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शंभर वर्षांच्या इतिहासाच्या कालरेषेचे अनावरण वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
वैद्यकीयदृष्ट्या मान्यता असणारे टिकोप्लॅनिन हे औषध सध्या कोरोनावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या तुलनेत दहापटींनी अधिक गुणकारी ठरू शकते, असा निष्कर्ष दिल्लीच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (आयआयटी) करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आला.
‘आयआयटी’मध्ये ‘कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स’ या संस्थेत करण्यात आलेल्या या संशोधनाअंतर्गत २३ मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला. सध्या वापरण्यात येणाऱ्या ‘लोपिनाव्हिर’, ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्विन’ आदी औषधांच्या तुलनेत ‘टिकोप्लॅनिन’ हे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये दहा ते वीसपट अधिक परिणामकारक ठरल्याचे आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक अशोक पटेल यांनी सांगितले.
कोरोनावरील आयुर्वेदिक उपचारविषयक चाचण्यांच्या अंतरिम अहवालातून आश्वासक निकाल हाती आले आहेत. पारंपरिक औषधांच्या तुलनेत नैसर्गिक उपचारांद्वारे कोरोना रुग्णांची लक्षणे अधिक वेगाने दूर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशामधील तीन हॉस्पिटलमध्ये या उपचारपद्धतीच्या चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलचा समावेश आहे.
‘इम्युनोफ्री’ ही आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि ‘रेजिम्युन’ ही न्युट्रास्युटिकल उपचारपद्धती यांच्या एकत्रित उपचारांचा अंतरिम अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये या उपचारांचे उल्लेखनीय परिणाम दिसून आल्याचे म्हटले आहे. हे उपचार घेणाऱ्यांपैकी ८६.६६ टक्के रुग्ण पाचव्या दिवशीच कोरोनामुक्त झाले, त्या तुलनेत पारंपरिक उपचार घेऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मात्र केवळ ६० टक्के इतके होते.