कोरोना रुग्णांसह मातोश्रीवर आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

 

 सातारा  : वृत्तसंस्था । दोन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन नागरिकांना मिळालं नाही तर कोरोनाग्रस्ताना घेऊन मातोश्रीवर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी  दिला आहे .

 

 

राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे, या पार्श्वभूमीवर सातारा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

 

यावेळी  सदाभाऊ खोत म्हणाले की, “तुम्हाला कमीशन मिळत नाही, तुम्हाला कंपन्यांकडून खंडण्या मिळत नाहीत म्हणून तुम्ही इतरांना देखील औषध घ्यायला या राज्यात तुम्ही बंदी केलेली आहे,  कोंडी केलेली आहे. ठाकरे सरकारला मी सांगतोय ही कोंडी तुम्हाला हटवावी लागेल.  कोंडी सरकारने नाही हटवली तर ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, त्या सगळ्या कोरोनाग्रस्ताना घेऊन मी अचानक मातोश्रीवर जाऊन ठाण मांडून बसणार आहे.

सगळ्याना मातोश्रीवर घेऊन जाण्याची तयारी करणार. दोन दिवसांत तुमच्या खंडण्या बंद करून सुरळीत पुरवठा नाही केला तर कोरोनाग्रस्त मातोश्रीवर येतील.”

 

राज्यातील संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधित आढळून येत आहेत, परिणामी आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.

Protected Content