जळगाव प्रतिनिधी । कोरोना बाधित असतानाही उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल न होता मुद्दाम आजाराचा प्रसार व लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या २७ वर्षीय तरूणावर सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा रुग्णालयाच्या परिचारिका सुनिता विजय गुरचळ यांनी फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ वर्षीय तरूणाला ताप, खोकल्याचे लक्षण जाणवत असल्याने ८ रोजी मनपाच्या डी.बी.जैन रुग्णालयात कोरोनाची अँटीजन टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याला सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल होण्याची समज दिली. मात्र, तो तेथून न सांगता निघुन गेला. तासाभरात त्याने महापालिकेचे छत्रपती शाहु रुग्णालय गाठून येथे तपासणी करुन घेतली. तेथील तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा अहवाल आला होता. रुग्णालयातून त्यास वारंवार फोन येत असल्याने त्याने माझा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे सांगत उपचारार्थ रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे यांनी विनवण्या केल्यावर तो, दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल झाला होता.
दरम्यान, मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये परिचारीका गुरचळ यांनी सोमवारी शहर पेालीस ठाण्यात तक्रार दिली असून, शासकिय आदेशाचे उल्लघंन करुन कोव्हीड-१९ रोगाचा प्रार्दुभाव व प्रसार करुन मुद्दाम लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल या नुसार शहर पोलीस ठाण्यात परिचारिका सुनिता गुरचळ यांच्या फियादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक अक्रम शेख तपास करीत आहेत.