फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहून आलेल्या जवळपास ५६ नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंद घेतलीं असून अशांची पालिकेच्या रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली व गरज पडल्यास खबरदारी चा उपाय म्हणून त्यांची न्हावी ग्रामीण रुग्णालयात पुढील आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.
फैजपूर शहरातील पुणे,मुंबई येथे नोकरी व कामानिमित्त असलेले काही नागरिक गावाकडे परतल्याने अशा नागरिकांची नोंद घेण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभाग, आशा वर्कर यांना सोपविण्यात आली आहे. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना मुख्याधिकारी यांनी पालिकेशी संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे. दरम्यान संचारबंदीची तीव्रता मंगळवारी शहरात जाणवत होती. जे नागरिक संचारबंदीलाही जुमानत नव्हते त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. संचारबंदी काळात भाजी मंडईत गर्दी होऊ नये म्हणून अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी शहरात हातगाडी काढून घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी संचारबंदी विषयी आवाहन करीत आहे.