मुंबई : वृत्तसंस्था । राज्यसेवा पूर्व परीक्षेदरम्यान कोरोनासदृश लक्षणे असलेल्या उमेदवारांना स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांची परीक्षेची संधी हुकणार नाही.
परीक्षा केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासह मुखपट्टी, निर्जंतुकीकरण द्राव आणि हातमोजे वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीकडून उमेदवार आणि परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावरील कार्यपद्धतीसंदर्भातील परिपत्रक एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही. उमेदवारांना एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. परीक्षा संपल्यावर वापरलेली मुखपट्टी, निर्जंतुकीकरण द्राव, स्वसंरक्षण साहित्य केंद्रावर ठेवण्यात आलेल्या आच्छादित कुंडीत टाकण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे.
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. लक्षणे असलेल्या उमेदवारांना स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट) पुरवण्यात येईल. त्यांची स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात येईल. उमेदवारांना आयोगाकडून तीन पदरी मुखपट्टी, निर्जंतुकीकरण द्राव, हातमोजे दिले जातील. परीक्षेच्या कालावधीत उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन निर्जंतुकीकरण द्रावाने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे