फैजपूर: प्रतिनिधी । कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन हरिद्वार कुंभमेळा शासन नियमाचे पालन करून यशस्वी झाल्याचे सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
नुकतेच जनार्दन हरिजी महाराज यांचे फैजपूर येथे आगमन झाले. फैजपूर येथील सतपंथ मंदिरात त्यांच्या मातोश्री यांनी औक्षण करून स्वागत केले. तत्पूर्वी भुसावळ रेल्वे स्टेशनवर आमदार संजय सावकारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. फैजपुर येथे आगमन होताच त्यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व एपीआय प्रकाश वानखडे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्यासह सहकार्यांची कोरोना चाचणी करून घेतली. ती चाचणी निगेटिव आली आहे.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, हरिद्वार येथील स्वामी जगन्नाथ धाम येथे आयोजित विविध कार्यक्रमात कुंभकाळातील शाही स्नानाचा लाभ, भारतभरातून आलेल्या सर्व संत महात्म्यांचे दर्शन व आशीर्वाद मिळाला. या सात दिवसांमध्ये संगीतमय सुमधुर गोपीगीत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचे प्रक्षेपण दिशा टीव्ही चॅनलवर प्रसारित करून जगभरातील असंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमात प्रेरणापिठ पिराणाचे जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वर दासजी महाराज, जगन्नाथ धामचे महंत अरुणदासजी महाराज, निर्मल पंचायती आखाड्याचे महंत ज्ञानदेव सिंह महाराज, महामंडलेश्वर हरि चैतना नंदजी महाराज, गीता मनिशी ज्ञानानंदजी महाराज, साधवी कृष्ण कांताजी महाराज, महामंडलेश्वर जयरामदास महाराज, कुसुंबा येथील श्री राम मंदिर ट्रस्टचे महंत भरत दासजी महाराज, फैजपूर येथील खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, सतपंत संस्थांचे प्रमुख देवजी भाई पटेल, महामंत्री पवन नारंग, मुखी महाराज अशोक नारखेडे यांनी उपस्थिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान श्री निर्मल आखाडा येथे सनातन वैदिक सतपंत संप्रदायाचे संत श्री जयराम हरीजी महाराज व दिव्यानंद जी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा होऊन त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी प्रदान केली.