चाळीसगाव, प्रतिनिधी । धुळे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले मेहुणबारे येथील ३ तर चाळीसगाव येथील ९ जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जळगाव येथे करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. बाविस्कर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात मेहुणबारे येथील एक महिला आली असल्याची माहिती मिळाल्यावरून या महिलेचा परिवार तसेच चाळीसगाव येथील त्यांच्या संपर्कात आले ९ व्यक्तींना पुढील तपासणीसाठी जळगाव सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाविस्कर त्यांना तपासणीसाठी पाठविले आहे. चाळीसगाव शहरात या बातमीने घबराट निर्माण झाली असून धुळे व मालेगाव येथील वाढत्या कोरोणा रुग्णांच्या संख्येमुळे चाळीसगाव तालुका आता सुरक्षित राहिला नसल्याचे बोलले जात आहे. मात्र नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक घरात राहून प्रशासनास सहकार्य केल्यास या परिस्थितीची आपल्याला लढता येईल असे मत डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.