मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आज जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच वायफळ खर्च टाळून काटकसर करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर देशासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी वायफळ खर्च टाळून काटकसर करण्यावर भर दिला पाहिजे. अन्यथा उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ येईल. कोरोनाच्या आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापासूनच या सगळ्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचे, याचा विचार सुरु केला पाहिजे,असेही शरद पवार म्हणाले.