बीजिंग : वृत्तसंस्था । कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा तपास करणे जागतिक आरोग्य संघटनेला शक्य होईल काय, तो कितपत विश्वासार्ह असेल, असा प्रश्न अनेक वैज्ञानिकांनी उपस्थित केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित काही तज्ज्ञांनी म्हटले आहे, की अमेरिका आणि चीन यांच्यात राजकीय तणाव असताना संयुक्त राष्ट्रांची जागतिक आरोग्य संघटना विषाणूचे मूळ विश्वासार्ह पद्धतीने शोधू शकत नाही. मूळ शोधायचे असेल तर १९८६ मध्ये चेर्नोबिल अणु दुर्घटनेच्या नंतर जसे निष्पक्ष पथक नेमून चौकशी करण्यात आली होती, तशा पद्धतीने चौकशी करण्यात यावी. जागतिक आरोग्य संघटना व चीन यांनी मार्चमध्ये पहिला अभ्यास जारी केला होता. त्यात हा विषाणू प्राण्यातून माणसात आला व प्रयोगशाळेतून तो सुटलेला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. आता जागतिक आरोग्य संघटना पुढच्या टप्प्यातील चौकशी करीत असताना त्यात पहिल्या मानवी रुग्णाबाबत माहिती घेतली जाणार आहे व कोणत्या प्राण्यामधून हा विषाणू माणसात आला यावर भर दिला जाणार आहे. वटवाघळातून हा विषाणू माणसात आला व अजूनही काही प्राणी या विषाणूचे मध्यस्थ असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे व चीनचे म्हणणे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे सार्वजनिक आरोग्य कायदा व मानवी हक्क अध्यक्ष लॉरेन्स गोस्टीन यांनी सांगितले, की जागतिक आरोग्य संघटनेच्या भरवशावर राहून विषाणूचे मूळ शोधणे चुकीचे आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेला चीनने नेहमीच असहकार्य केले असून भूलथापा दिल्या आहेत.