पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । पहुर पेठ मधील १२० वर्षांपासूनची परंपरा असलेले श्रीराम जन्मोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
पहूरपेठेतील श्रीराम मंदिरात सालाबादाप्रमाणे दरवर्षी चैत्र पाडवा (गुढीपाडवा) या दिवशी रामायण ग्रंथाची विधीवत पुजा करून ७ दिवस अखंड दिवा तेवत ठेवून किर्तन सप्ताहास प्रारंभ होवून श्रीराम नवमी, श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सवानिमित्त काल्याचे कीर्तन होवून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो. परंतु सध्या संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने खबरदारी घेवून सर्वतोपरी प्रयत्न करीत असून गर्दी होवू नये व नियमाचे पालन व्हावे, यासाठी श्रीराम जन्मोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पाटील यांनी सांगितले. श्रीराम मंदिरात आरती करून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. गेल्या 50 वर्षांपासून पहूर पेठ येथील पुजारी दगडू काशिनाथ बोरसे हे आज मंदिर पुजारी म्हणून सेवानिवृत्त होत आहे. मंदिर पुजारी यांनी सतत ५० वर्ष मंदिराची निशुल्क सेवा केल्याबद्दल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पाटील यांच्याहस्ते बोरसे यांचा ट्रस्टच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर आजपासून मंदिरची सेवा शंकर लोहार यांचे नातू किशोर भानुदास लोहार हे करणार आहे.