रावेर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना आजाराची लक्षणे जाणवताच त्वरीत नजीकच्या रूग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले. ऐनपुर-खिरवड व निंभोरा-तांदलवाडी जि प गटाची कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. थोरबोले पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संक्रमणापासून बचावाकरिता पुढील सहा महिने काळजी घेणे खुप गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत असुन यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती कमी असलेल्यांनी लवकरात-लवकर उपचार करा. वयोवृध्द व आजारी रुग्णांची देखील काळजी घ्या. रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी रुग्णाला डॉक्टरांपर्यंत पोहचवा. त्यांची तपासणी करा, गरजेनुसार स्वॅब व ऑक्सीजनची लेव्हल तपासून घ्या, ताप, सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, तपासणीला घाबरू नका, २०७ पॉझीटिव्ह रुग्ण असून १९रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे ९ टक्के प्रमाण आहे, असेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, पं.स.सदस्य दिपक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील, नायब तहसिलदार संजय तायडे, वासुदेव नरवाडे यांच्यासह परिसरातील असलेल्या गावातील आरोग्यसेवक व आरोग्यसेविका उपस्थित होते.
तालुक्याची परिस्थिती
रावेर तालुक्यातील २१ गावांमधील एकूण २०९ कोरोना बाधित रूग्णांची संख्यात आहे. त्यापैकी १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १६१ जणांना कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाला घाबरू नका तर लढा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेवरुन तालुक्यातील विविध गटांमध्ये प्रांतधिकारी व तहसीदार जाऊन बैठका घेत आहे. लोकांना कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी मार्गदर्शन करताय प्रांत अजित थोरबोले हे बीएएमएस डॉक्टर असून या कोरोनाविरुध्द नागरीकांनी कसे लढावे. याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करताय कोरोनाला घाबरू नका तर त्यांच्या विरुध्द लढा असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.