वॉशिंग्टन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन याच्या प्रतिकारासाठी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील १५ कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांनी आधीच व्यक्त केली होती. या पार्श्वभूमिवर, देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याचा मुकाबला करण्यासाठी ५० अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. या आधी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेननेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत ११००हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून ४० लोकांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.