वर्धा : वृत्तसंस्था । कोरोनामुक्त नागरिकांसाठी बुरशीचे संक्रमण ‘म्युकरमायकोसिस’च्या रूपाने प्राणसंकट बनले आहे. ‘ई-पंचसूत्री’चे पालन केल्यास हमखास रोग निवारण होत असल्याची भूमिका दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मांडली आहे.
कोरोना उपचारात स्टेरॉईड व अन्य इंजेक्शन देण्यात आलेले वयस्कर या आजाराला सामोरे जात आहेत विद्यापीठाच्या शरद पवार दंत रुग्णालयात या व्याधीवर यापूर्वी अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र सहा महिन्यात रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे रुग्णालयाच्या आकडेवारीतून दिसून येते.
विद्यापीठाचे कुलगुरू व प्रसिद्ध मुख शल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले म्हणाले की, हा बुरशीजन्य आजार पूर्वीपासून वैद्यकीय क्षेत्राला परिचित आहे. साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक आणि डोळ्यांची हानी करतो. वरचा जबडा, सायनस व फुफ्फुसांना बाधित करणारा हा आजार श्वसनयंत्रणा डोळे आणि मेंदूवर विपरीत परिणाम करतो,
. मुख शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नितीन भोला यांनी नमूद केले की, भारतात १ लाख लोकसंख्येमागे १४ रुग्ण असे या आजाराचे प्रमाण आहे. मध्य भारतातील विविध जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार झालेत. आजार संसर्गजन्य नसला तरी कोरोनामुक्त झाल्यावरही काळजी घेणे आवश्यक आहे.
शरीरात निरंतर वाढत जाणारी बुरशी डोळे, नाक, चेहरा, टाळू व शेवटी मेंदूवर आघात करते. सतत डोकेदुखी, डोळ्यांमधून पाणी गळणे, अंधूक दिसणे, दात दुखणे, त्वचा लालसर काळपट होणे, घसा बसणे अशी लक्षणे दिसतात. हे दिसून येताच तत्परतेने वैद्यकीय उपचार आवश्यक ठरत असल्याचे नाक, कान, घसारोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद देशमुख यांनी सांगितले.
कोरोना उपचारात ज्यांना स्टेरॉईड किंवा टॉसिलिझुमॅप इंजेक्शन देण्यात आले किंवा जे रुग्ण तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ प्राणवायू उपचारावर होते, अशा साठ वर्षांवरील रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. म्हणून अत्याधिक गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर केला पाहिजे, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन डायगव्हाणे यांनी दिला.
रोग निवारणासाठी ‘एज्युकेशन, अर्ली डिटेक्शन, एंडोस्कोपिक स्क्रिनिंग, इर्मजन्सी सर्जरी व इकॉनॉमिक सपोर्ट’ ही ई-पंचसूत्री आवश्यक ठरल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सूचित केले.
कोरोना उपचारात स्टारॉईडच्या अति वापरासारख्या कारणांनी रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने हा फंगस क्रियाशील होत असल्याचे डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले.