जळगाव, प्रतिनिधी । येथे जिल्हास्तरावर कोविड-19 वॉर रुमची स्थापन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये जिल्हा रुग्णालय येथील आयुष विभागातील डॉक्टरांची नियुक्त करण्यात आली असून ते कोरोनाग्रस्त रुग्णांना, नागरिकांना आजाराविषयी ऑनलाईन सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन, फेरतपासणी सल्ला देणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून आतापर्यंत ४८ हजार ११७ च्या वर कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. असे असले तरी या आजाराचा धोका अजूनही पुर्णपणे टळलेला नाही. या आजारावर लस शोधणेसाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परंतु परिणामकारक लस शोधण्यात अजूनही यश आलेले नाही. म्हणून सदरच्या आजाराविषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. दिर्घकाळ लॉकडाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्नही कमी झाले आहे. काही दुर्गम भागातील नागरिकांना जागेवरच तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकरीता या वॉर रुममध्ये नियुक्त जिल्हा रुग्णालय येथील आयुष विभागातील डॉक्टरांमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांना, नागरिकांना आजाराविषयी ऑनलाईन सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन, फेरतपासणी सल्ला देतील. त्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत राहील. या वेळेत मोबाईल ८०१०७१५७०९ वर संपर्क केल्यानंतर कोरोनाबाबत रुग्णांना मोफत आरोग्यविषयक सल्ला देणेत येईल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.