कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना मूत्रमार्गात संसर्गाचा धोका

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये हृदयरोग, मेंदूसंबंधी विकार, म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस या आजारांची लक्षणं दिसून आली होती. परंतु, आता अनेक रूग्णांमध्ये मूत्रमार्गात संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे.

 

दुसऱ्या लाटेदरम्यान २० ते ६० वयोगटातील कोविड रूग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे मूत्रमार्गात संक्रमण होत असल्याचे दिसून आले.

 

मुंबईत राहणाऱ्या ३५ वर्षीय अमिता (नाव बदललेलं) यांना जुलै २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु, काही दिवसांनी या महिलेला लघवी करताना जळजळ आणि प्रचंड वेदना जाणवत होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, त्रास वाढू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय चाचणी केली असता या महिलेला मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय) झाल्याचे समोर आलं. करोनातून ठीक झाल्यानंतर या महिलेमध्ये मूत्रमार्गात संसर्ग झाल्याची लक्षणे विकसित झाल्याचे लक्षात येताच या महिलेवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आल्याने या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. असे अनेक रुग्ण आज वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील यूरोलॉजिस्ट डॉ. तरूण जैन म्हणाले की, “कोरोनातून बरे झालेल्या अनेक रूग्णांमध्ये सध्या मूत्रमार्गात संसर्ग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लागण झाल्यानंतर रूग्णाला स्टेरॉईड औषध दिला जातात. या औषधांचा अतिवापर केल्यास रूग्णामध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका संभवू शकतो. म्हणूनच पोस्ट कोविड रूग्णांमध्ये आता मूत्रमार्गात संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त येणे, ताप, लघवीचा उग्र वास येणं, ओटीपोटात वेदना जाणवणं, मळमळ आणि उलट्या होणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात. हे त्रास जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास निदान होऊन योग्य उपचार घेतल्याने तो कमी होऊ शकतो.

 

जे. जे. रूग्णालयातील नेफ्रोलॉजी विभागाच्या डॉ. गीता शेठे म्हणाल्या की, पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मूत्राशयात संसर्ग होत असल्याच्या प्रकरणांमध्ये सध्या वाढ होताना दिसून येत आहे. यात मुख्यतः मधुमेही रूग्ण आणि उपचारात स्टेरॉईडचा अतिवापर झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दररोज ५ ते ७ रूग्ण मूत्राशयात तीव्र स्वरूपाचा संसर्ग झालेले येत आहे. वेळीच लक्षव न दिल्याने किडनीचा त्रासही अनेकांना जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बहुतांश ४५ ते ५० वयोगटातील रूग्णांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे.

 

केईएम रूग्णालयातील युरोलॉजी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ. सुजाता पटवर्धन म्हणाल्या की, अनेक रूग्ण आजार अंगावर काढत असल्याने सध्या मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय) झालेले रूग्ण गंभीर स्वरूपात उपचारासाठी येत आहेत. मूत्राशयाच्या संसर्गाकडे वेळीच लक्ष न दिल्याने ‘एम्फिसेमेटस पायलोनेफ्रायटिस’ (मूत्रपिंडाचा दाह) रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. या आजाराचा थेट परिणाम हा किडनीवर होतो. उपचार वेळेत न झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता असते. सध्या कॅन्सर रूग्णांमध्येही मूत्राशयात संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक दिसून येत आहे.

 

कोविड-१९ मधून ठीक झाल्यानंतर या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. यासाठी भरपूर पाणी प्यावेत, वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होत असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण दहा टक्के वाढवावे. लघवी होत असल्यास तातडीने जावे, कमोडचा वापर करण्यापूर्वी सीट स्वच्छ करावी. महिलांनी शौचालयाचा वापर केल्यानंतर योनी आणि मूत्रमार्गात संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. पाळीच्या दरम्यान प्रत्येकी दोन ते चार तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावेत. मूत्रमार्गाला संसर्ग झाल्यानंतर चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ आणि मसालेदार पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत. त्याचबरोबर कॅफिनयुक्त पेये, मद्यपान, शीतपेये यापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. या पदार्थांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असते.”

 

Protected Content