चाळीसगाव प्रतिनिधी । शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १३ व १४ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेले नियमांचे पालन करण्यास चाळीसगावकर सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १३ व १४ मार्च रोजी जनता कर्फ्यू पुकारले आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव नगरपालिका हद्दीत १३ मार्च रोजी १ वाजेपासून तर १४ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. प्रांताधिकारी साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. यावेळी खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, सहा. गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोव्हीड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेले आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यांनी नियमांचे पालन केले नाही त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. चाळीसगाव या जनता कर्फ्यूला सहकार्य करतील असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले आहे.