डेहराडून : वृत्तसंस्था । भाजपा नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लीम समाजातील लोक कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
लसीकरणासंदर्भात मुस्लीम समाजामध्ये अनेक गैरसमज असल्याचंही रावत यांनी म्हटलं आहे. सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं.
“मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर राहत आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरतायत आणि त्यांच्यात लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ऋषिकेश येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी आपलं मत मांडलं. रावत यांनी यावेळी सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहनही केलं.
“तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरु शकते. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो,” असं रावत यांनी म्हटलं आहे. देशातील ८० टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल असंही रावत यांनी म्हटलंय.
पाकिस्तान सरकारने लसीकरणासंदर्भातील विचित्र नियम लागू केल्याचा उल्लेखही रावत यांनी केला. पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे, वेतन रोखून धरणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडलं आहे. अशा निर्णयांमुळे लसीकरणासंदर्भात मोठ्याप्रमाणात जनजागृती निर्माण करता येते, असं रावत यांनी म्हटलं आहे.
उत्तराखंड सरकारने आरटीपीसीआर चाचणीचा निकाल नकारात्मक असणाऱ्यांना चारधाम यात्रेसाठी परवानगी देण्यात येईल असंही सांगितलं आहे. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्यातील अनेक देवस्थाने सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्यात ती पुन्हा सुरु केली जात आहेत.