कोरोनाची लस नाकावाटेही देणार

न्यूयॉर्क: वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लस विकसित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, इंजेक्शनशिवाय लस देण्यासाठीचा पर्याय शोधण्यात येत आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी नाकावाटेही लस देण्यात येणार आहे. अमेरिकेतील कोडाजेन्सिक्स या कंपनीने लस तयार केली आहे. या लशीचे भारतात उत्पादन होणार आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लशीचे उत्पादन करणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. अमेरिकेतील ‘कोडाजेन्सिक्स’ कंपनी इंजेक्शनऐवजी नाकावाटे देण्यात येणारी लस तयार करणार आहे. या लशीची प्री-क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. प्राण्यांना लस देण्यात आल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

आता मानवी चाचणीसाठीही कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या वर्षाखेरपासून या लशीची ब्रिटनमध्ये मानवी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादित करण्यासाठी भारताने परवानगी दिली असल्याचे ‘कोडाजेन्सिक्स’ने म्हटले आहे. ही लस इंजेक्शनपेक्षाही अधिक प्रभावी ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नाकाद्वारे लस देण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

सिरम इन्स्टिट्यूट सध्या ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या लशीचे उत्पादन करत आहेत. सध्या ऑक्सफर्डच्या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस विकसित झाल्याची घोषणा झाल्यानंतर लस वितरणाची तयारी करण्यात येणार आहे.

जगभरात जवळपास १५० लशींची चाचणी सुरू आहे. यामधील ३८ लशींची मानवी चाचणी सुरू आहे. मॉडर्ना, फायजर, अॅस्ट्राजेनका, सिनोवॅक आदी जवळपास आठ लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. चीनने नोव्हेंबरमध्ये लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली आहे. रशियानेदेखील सामान्य जणांना लस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

Protected Content