कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपच जबाबदार : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपच जबाबदार असल्याचे विधान केले आहे.

एकीकडे कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतांना दुसरीकडे याचवरून आता राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यात आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण भाजपवालेच त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारोंच्या संख्येने लोक जमवत आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट असल्याचा आरोप मलीक यांनी केला आहे.

मलीक पुढे म्हणाले की, भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता जाताना दिसत आहे. योगींचा चेहरा बाजूला करून त्यांना उत्तर प्रदेशात निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव भाजपा खेळू शकते. निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव करू नका. निवडणुका वेळेवर घ्या. राष्ट्रपती राजवट लावून राज्यांचे अधिकार आपल्या हातात घेण्याचा डाव पुढे आणू नका. निवडणूक घेत असताना पाच लोकांपेक्षा जास्त प्रचाराला हजर राहणार नाही, डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अशा निवडणुका होऊ शकतात, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Protected Content