कोरोनाकाळातही सुजाण पालकांना वेळेच्या रचनात्मक उपयोगासाठीची संधी

 

कोरोनाकाळातील हाती आलेल्या भरपूर वेळचा उपयोग पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत खंड पडू न देण्यासह त्यांच्या सुप्त गुणांच्या विकासासोबतच त्यांचा कल पाहून करिअर निवडण्यासाठी त्यांना मदत करावी त्यातून त्यांना  पालकांचा जो मानसिक आधार मिळेल तो लाखमोलाचा ठरू शकेल .  या संदर्भात पालकांच्या भूमिकेविषयी संदीप पाटील यांनी मांडलेले हे मुक्तचिंतन 

 

अवघी सृष्टी एका अनपेक्षित संकटाला सामोरे जात आहे, अशी अनेक संकटे आलीत, पण या सर्व संकटावर मात करून मानवाने त्याचे अस्तित्व टिकवून ठेवलं आहे मला फक्त शिक्षणाविषयी बोलायच आहे शासनही लवकरात लवकर प्रत्येक बालकांपर्यंत शिक्षण कसे पोचविता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे. पण ह्या काळातील संधीवर थोडं बोलतोय

आजवर पालकांना वेळ नव्हता, मुलांना चांगल्या शाळेत टाकलं की आपलं काम संपल, आणि कामात आपण व्यस्त व्हायचं हा पालकांचा अलिखित नियम. (जिथे फिस जास्त, ती शाळा चांगली) प्रचंड फिस भरून वेगवेगळे ट्युशन्स, क्लास यांची जोड .

 

आपल्यापैकी किती लोक शाळेच्या आणि ट्युशन्सच्या भरवशावर न राहता पाल्यांसाठी वेळ देत होते? या प्रश्नाचं उत्तर बहुतांशी नाही असेच असणार आहे… खरी संधी इथेच आहे.

 

आज पालकांनाही वेळ आहे. दिवसभर कोरोनाच्या बातम्या आणि किती पेशंट वाढलेत, पगाराचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, व्यवसायाचा प्रश्न.. हे सारं काही सार्वत्रिक आहे, ती समस्या तुमच्या एकट्याची नाहीच. त्यामुळे तुमच्या खऱ्या संपत्तीच्या संरक्षण आणि त्या संपत्तीला वाढविण्यासाठी आज जो वेळ मिळतो आहे तो सत्कारणी लावायचाच हवा. दिवस भरातल्या वेळेतून एकदोन तास तुमच्या मुलांसाठी देता आला तर.

मोबाईल आणि यूट्यूब त्यांच्या हातात देऊन त्यांना हे शिकविण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्यावर हे शिकून त्यांच्याशी संवाद साधला तर हे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल

हा काळ फक्त पुस्तकी शिक्षणाचा नाही तर जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकविण्यासाठी आहे. अशा आपत्तीच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःचा बचाव कसा करावा ह्या गोष्टी आपण नक्कीच त्यांना शिकवू शकतो.

छंदाना पुन्हा नव्याने जोपासा आणि तुमच्या पाल्यांनाही त्यात सहभागी करन घ्या.) पाल्यांच्या आवडीनिवडी बघून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा. चित्रकला, अक्षरलेखन, संगीत, बैठे खेळ- कॅरम, बुद्धिबळ,  हस्तकला, पाककला, घरातली कामे , रात्री आकाश निरीक्षण , योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा गोष्टींसाठी आपण पाल्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.

 

त्यांच्या करिअरची निवड त्यांच्या आवड आणि शैक्षणिक गुणात्मकता यांची सांगड घालून देऊन समुदेशन करणाऱ्या तांत्रिक सल्लागाराकडून करण्याचा प्रयत्न करा

शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाच्या दक्षतेची आजपासून त्यांना सवय करून घेता येईल. ऑनलाईन किंवा मोबाईल द्वारे शिक्षणाच्या मी विरोधात नाही परंतु नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशा गोष्टींपासून दूर ठेवणे जास्त हितावह असेल अस वाटते. ऑनलाईन शिक्षण देण्याच्या पद्धतीत चुकून एखादा बालक एखाद्या लैंगिक घटनेस बळी पडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षण देणाऱ्या शिक्षक, संस्था यांच्यावर असेल, त्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहेच.

मागील वर्षांपासून पाल्य घराच्या बाहेर पडला नाही, अशा वेळेस त्यांची मानसिकता सांभाळणे हे सर्वात अग्रक्रमाने पालकांनी करावयास हवे. शिक्षकांनीही याकाळात आपली जबाबदारी मोठी आहे याची जाणीव ठेवून पालकांशी संपर्कात राहणे आवश्यक वाटते. भविष्यात सर्वकाही सुरळीत झाल्यावर पाल्यांसाठी असा वेळ देणे पुन्हा कधी शक्य होईल हे आपल्याला ही ठाऊक नाही, म्हणून सर्वांनी पालक म्हणून ही जबाबदारी स्वीकारायला हवी.

आज पाल्यांसाठी आपण वेळ देऊ शकलो तर जनरेशन गॅप नावाचा प्रकार, मुलांच्या आत्महत्या, बिघडणार्या मानसिकता, हट्टीपणा, अशा अनेक समस्याही सोडविल्या जाऊ शकतील, त्यासाठी हा एक सुवर्णकाळच म्हणावा लागेल संवादासाठी.

आपणही यावर फक्त विचार न करता कृतीला सुरुवात करावी, ज्ञान हे फक्त पुस्तकी नसते, पुस्तकाच्या बाहेर खूप ज्ञान आहे आणि ते मिळविण्यासाठी आपण फक्त पाल्यांना मदत करायची आहे.

 

— संदीप पाटील (सोनवणे) डांभुर्णी (ता – यावल }

 

Protected Content