Home Cities जळगाव कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी पेरणेफाटा कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास जिल्ह्यातील अनुयायांनी घरात बसूनच अभिवादन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

राज्यात तसेच जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्य सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. 1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 1 जानेवारी 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून जयस्तंभ पेरणे येथे न जाता साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरुपात अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रमुख अभिजित राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Protected Content

Play sound