कोणत्याही रूग्णांसाठी व्हिजीट फी आकारू नये- जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टर्सची व्हिजीट समाविष्ट असल्यामुळे कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

या संदर्भात आज जिल्हा माहिती कार्यालयाने एक निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, खाजगी रुग्णालयात असलेल्या एकूण बेड क्षमतेपैकी ८० टक्के खाटा कोव्हिड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव बेडस म्हणून ठेवण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार हॉस्पिटलच्या एकूण बेड संख्येपैकी राखीव ८०% बेडकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० मधील तरतुदीस अधीन राहून अनुसूची क प्रमाणे लागू राहतील. उर्वरित २० टक्के खाटांना खाजगी रुग्णालयाने प्रमाणित केलेल्या दरानुसार रक्कम देय राहील. याबाबतची प्रसिद्धी शासनाच्या निर्देशानुसार संबंधित खाजगी रुग्णालयांनी ८०-२० याप्रमाणे खाटांची रूम क्रमांकांबाबतची माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहेत.

दरम्यान, दिनांक २१ मे, २०२० च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने आदेश क्रमांक ४१०, दि. ११ ऑगस्ट, २०२० व ४६१, दि. ९ सप्टेंबर, २०२० समवेतचे क विहित खाजगी रुग्णालयाचे पॅकेज व्यतिरीक्त दरपत्रक रद्द करण्यात येत आहे. दि. ३१ ऑगस्ट, २०२० चे अध्यादेश क अनुसूचीनुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून विहित दरापेक्षा जादा आकारणी केल्यास ती लेखापरीक्षण पथकाने वसूल पात्र ठरवावी. व त्या रुग्णालयास अध्यादेशामधील संदर्भ एक ते सात अन्वये शल्य चिकित्सक, जळगाव यांनी लेखापरीक्षण पथकाने सुचवलेली वसुलपात्र रक्कम पडताळणी करावी. वसुलपात्र रक्कम संबंधित रुग्णालयाने रुग्णास परत करणेबाबत शल्य चिकीत्सक यांनी नियमित आदेश प्रस्तुत करावे. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

याबाबत नियंत्रण ठेवून दैनंदिन विहित कार्यवाही अवलंबावी व दैनिक अहवाल विहित कार्य प्रणालीस सादर करावा. शासन अधिसूचना दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० मधील परीच्छेद क्रमांक १२ नुसार शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टर यांची व्हिजीट समाविष्ट असल्यामुळे कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये. डेडीकेट कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक खाजगी दवाखान्यात शासनाचे लेखा विभागाचे अधिकारी देयकाचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत.

अधिक माहितीसाठी अथवा तक्रारीसाठी नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२२६६११ यावर संपर्क साधावाअसेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content