शिलॉंग – मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांच्यासह ११ आमदारांनी रात्री तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे येथे पक्षाला जबर धक्का बसला आहे.
मेघालय कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे. विशेष करून विन्सेंट एच माला यांना प्रदेशाध्यक्ष केल्यापासून माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि त्यांचे सहकारी नाराज होते. यामुळे अंतर्गत कलहास प्रारंभ झाला होता. या पार्श्वभूमिवर, मुकूल संगमा आणि इतर ११ आमदारांना कॉंग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासोबत कॉंग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
या घडामोडी काल रात्री घडल्या असून आज याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमचे सदस्य कॉंग्रेस सदस्यांच्या संपर्कात होते. मात्र संगमा यांनी तृणमूल कॉंग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संगमा यांनी आपण पक्षात राहून नव्याने काम करु असं सांगितलं होते. मात्र त्यांनी आकस्मीक निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला जबर धक्का बसल्याचे मानले जात आहे.