रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुंभारखेडा येथील एका शेतातून घड कापून टाकत धमकावणार्या चिठ्ठी लिहून ठेवणार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील अनिल पाटील यांच्या बागेतील केळीचे ३० घड कापून फेकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. चिनावल पाठोपाठ कुंभारखेडा येथे हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली होती.
दरम्यान, याच ठिकाणी केळी खोडांवर शेतकर्यांना धमक्या देणार्या तीन चिठ्ठ्या चिकटवल्या होत्या. यात त्या व्यक्तीने शेतकर्यांनी गावातील लोकांनाच कामाला ठेवावे असा इशारा दिला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल घाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या अनुषंगाने पोलिसांनी कुंभारखेडा येथीलच अतुल श्रीराम महाजन (वय ३२) याला अटक केली. चौकशीत त्याने कामावरून कमी केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे सांगितले. एपीआय देविदास इंगोले यांच्यासह उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड यांचेसह पथकाने ही कारवाई केली.