इडुक्की (वृत्तसंस्था) केरळमधील भूस्खलनातील मृतांची संख्या १३ वर पोहचली आहे. तर १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच, ७० पेक्षा जास्त लोक अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इडुक्की जिल्ह्यातील राजमालामध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भाग पर्यटन स्थळ मुन्नारपासून २५ किमी अंतरावर आहे. राज्य सरकारने बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे. ज्या ठिकाणी भूस्खलन झाले, त्या ठिकामी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची कॉलोनी होती. लँड स्लाइडमध्ये संपूर्ण परिसर वाहून गेला. यात मजुरांचे २० पेक्षा जास्त घरे वाहुन गेले. एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या परिसरात ७० ते ८० लोक वास्तव्यास असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. दरम्यान, सतत सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, केरळच्या अनेक भागात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजमालाला जोडणारा एक पुलही वाहून गेला आहे. यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे.