मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र गांभीर्याने पाहत नसेल वा त्यांचंही नियंत्रण सुटलं आहे. हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर समिती नियुक्त करावी ती यावर काम करेल म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका आज शिवसेना नेते खा . संजय राऊत यांनी मांडली
केंद्राकडून याचं नियंत्रण होणं गरजेचं आहे. राजकारणविरहीत काम केलं, तरच हा देश वाचेल नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं,” असं इशारा राऊत यांनी दिला.
कोरोनामुळे देशात हलकल्लोळ माजला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांचे फरफट सुरू आहे, तर दुसरीकडे आरोग्य सेवांवरील ताण प्रचंड वाढला आहे. बेड, ऑक्सिजन, औषधीअभावी रुग्णांचा तडफडून प्राण सोडावे लागत आहे. देशातील या परिस्थितीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतः याचिका दाखल करून घेत केंद्र सरकारला फटकारलं असून, काही निर्देशही दिले आहेत. देशातील परिस्थिती आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,”सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढतोय… झगडतोय…संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आखल्या आहेत. महाराष्ट्राला सुद्धा ज्याप्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला पाहिजे. तो होत नाही. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद आहेत. राजेश टोपेंचं निवेदन ऐका… वेदना कळेल. सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे, पण फटकारून काय करणार?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थिती केला.
महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. महाराष्ट्राला लढण्याची, संकटाचा मुकाबला करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू लढाई सुरू केली आहे. यातून नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो,” असं राऊत म्हणाले.