मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कोरोना काळात राज्य सरकारला आत्तापर्यंत ५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही, असे ठाकरे सरकारकडून भासवले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना विरोधात लढा देत असताना केंद्राकडून हजारो कोटी रुपयांची मदत मिळूनही राज्य सरकार काही करत नाही अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये राज्य सरकारवर टीका करत असताना त्यांनी केंद्र सरकारचे तोंडभर कौतुक केले. केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाकडून राज्य सरकारला तब्बल 28,104 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. ती कशी विभागली गेली आणि कुठे खर्च करण्यासाठी देण्यात आली त्याचा तपशील फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न आपल्या फेसबूक लाइव्हमध्ये केला आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून काहीच मिळाले नाही असा आरोप केला जात असला तरी हा आरोप खोटा आहे असे फडणवीसांनी स्पष्ट केले. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच पहिल्यांदा सुब्रमण्यम स्वामींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. त्यानंतर नारायण राणे यांनी ही मागणी केली. राणेसाहेब अन्याय सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ते थेट बोलतात. राज्यातील स्थिती पाहून त्यांनी ती मागणी केली. पण महाराष्ट्रातील स्थिती पाहता आम्हाला राजकारण करण्यात रस नाही. आम्हाला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही,’ असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.