केंद्रातर्फे शेतकरी विरोधी विधेयक पारित ; काँग्रेस जिल्ह्याभरात विविध आंदोलने छेडणार

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया विधेयकाला विरोध म्हणून जिल्हा काँग्रेसतर्फे २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध आंदोलने छेडली जाणार आहे. या आंदोलनांची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाच्या समोर दुपारी ३ वाजता आंदोलने छेडले जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी कळविले आहे.

या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी व हुकूमशाही सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीचार्ज करीत आहेत. या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संस्थेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिबांवर व शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असा हा कायदा लादत आहेत. या अन्यायाविरुद्ध व अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हाभर तालुकास्तरीय आंदोलने छेडले जाणार आहे.

या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,यापूर्वी ही दिनांक २६ सप्टेंबर पासून भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मार्फत भाजप सरकारचा निषेध करण्याचे व सदर काळा कायदा मागे घेण्याची मागणी करण्याची मोहीम सुरू झालेली असून, यापुढे २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी विविध आंदोलने छेडली जाणार आहेत. त्यात सर्वप्रथम दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे. या दिवशी तालुकास्तरावर कॉंग्रेसच्या मुख्यालयात आणि जिल्हा मुख्यालयामध्ये धरणे आंदोलने तसेच मोर्चा काढून शेतकरी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे.यावेळी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन हे आंदोलन छेडले जाणार आहे.

तसेच १० ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या किसान संमेलनातून ही भाजपाने केलेल्या या अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहीम राबवून दोन कोटी सह्यांचे निवेदन तयार करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार असून शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा निर्माण केला आहे तो मागे घ्यावा यासाठी सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आवाज उठविला जाणार आहे.

Protected Content