केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय?; केंद्रातील सरकार देशाचे आहे परदेशातील नाही

सोलापूर: वृत्तसंस्था । पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय? केंद्रातील सरकार देशाचे आहे. ते काही परदेशातील सरकार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना सुनावले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशही त्यांनी सुपूर्द केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी अतिवृष्टीच्या संवेदनशील विषयातही राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांचा समाचार घेतला व केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘ही राजकारणाची वेळ नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल?’, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला होता. पूरस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी आवश्यक ती मदत करू, असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले.

पावसाची ही परिस्थिती आताच, आजच कळली असे नाही. आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते. अजून परतीचा पाऊस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे संकट टळलेले नाही. असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच सतर्क राहण्याची विनंती केली.

पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही. तेव्हा कोणत्याही स्थितीत प्राणहानी होऊ देऊ नका, अशा सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले, पूर्व विदर्भात पूर आला, त्यावेळीही मदत केली आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

केवळ काहीतरी घोषणा करायची म्हणून करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरू केले आहे. पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल. जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं. उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content