जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून दोन ठिकाणी कॅन्टोनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व उपाययोजना प्राधान्याने कठोरपणे राबवाव्या. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात जे नागरिक शासनाच्या निर्देशांचे पालन करणार नाही. प्रशासनाला खोटी माहिती देतील, स्वतःची खबरदारी घेण्यात हलगर्जीपणा करतील अशांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी महापौरांच्या दालनात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, उपयुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.राम रावलानी, डॉ.विकास पाटील, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपाययोजनांचा महापौर भारती सोनवणे यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची १०० टक्के तपासणी करा. प्रत्येकाला आरोग्य सेतू अँप सक्तीने डाऊनलोड करायला सांगा. तपासणी पथकाला चुकीची माहिती देणारे आणि खरी माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा. कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेऊ नका. क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांचा वेगळा गट करा. विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून वार्ड ऑफिसरने पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावी. प्रभागात फिरताना मनपा अधिकारी, आशा वर्कर व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पाणी बॉटल, ओआरएस पावडरसोबत ठेवा. पोलीस प्रशासनाची अधिकाधिक मदत घ्या. कॅन्टोनमेंट झोनमधील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करा, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मांडल्या.
आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले की, कोरोना संसर्गाचा मूळ स्रोत शोधा जेणेकरून कोरोनाला अटकाव घालण्यात मनपा प्रशासनाला यश येईल. डॉक्टरांसह प्रतिष्ठित व्यक्ती लो रिस्कमध्ये असतील तरच त्यांना होम क्वारंटाइन करण्याची परवानगी द्या. उद्या जर वैद्यकीय सेवेसाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास त्यादृष्टीने आजच नियोजन करून ठेवा. सार्वजनिक शौचालये दररोज निर्जंतुक करा. कॅन्टोनमेंट झोनमधील एकही संशयीत नजरेतून सुटता कामा नये. सर्व्हेक्षण करताना नगरसेवक, स्थानिक समाजसेवकांची मदत घ्या. थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमिटर आणि पीपीई किट तातडीने खरेदी करा. शहरात २ फिवर क्लिनिक सुरू करा, त्याठिकाणी सर्व यंत्रणा उभी करा. आवश्यकता भासल्यास आयएमए, रेडक्रॉसची मदत घ्या. रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांची मदत घेऊन औषधी वितरित करा, असे आयुक्तांनी सांगितले.
मनपा प्रशासनाला दोन्ही आमदारांनी ५०-५० लाख रुपये देऊन एक महिना झाला तरीही आवश्यक असलेल्या वैद्यकीय सामुग्रीचे स्पेसिफिकेशन काढण्यास दिरंगाई होत असल्याची बाब नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लक्षात आणून दिली. या मुद्द्याला डॉ.राधेश्याम चौधरी यांनी देखील दुजोरा दिला. डॉ.चौधरी म्हणाले की, प्रत्येक प्रभागात बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाऊन परत आलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण करताना मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, जुना फुफुसांच्या आजाराची तसेच त्या कुटुंबातील नागरिकांच्या व्यवसाय देखील नोंद करण्याची सूचना त्यांनी मांडली. मनपाच्या आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे विनंती करून अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
रुग्ण उशिरा माहिती देत असल्याने मृत्युदर वाढण्याची शक्यता
रुग्ण माहिती लपवत असल्याने त्यांच्यावर योग्यवेळी योग्य पद्धतीने उपचार केले जाऊ शकत नाही. रुग्ण गंभीर परिस्थिती असताना रुग्णालयात येत असल्याने त्यांच्यावर पुरेसा उपचार होत नसल्याने त्यांचा मृत्यू ओढवतो आहे. काही रुग्णांचा मृत्यू घरीच होत असल्याची बाब बैठकीत समोर आली. रुग्णांनी लक्षणे दिसतात वेळीच प्रशासनाला माहिती दिल्यास त्यांचा जीव वाचू शकतो.