मुक्ताईनगर, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कुऱ्हा काकोडा परिसरासाठी अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिका मिळावी आणि मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यासाठी शवपेट्या मिळाव्या अशी मागणी केली
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ,वढोदा परिसरातील अति दुर्गम गावे जोंधनखेडा, हिवरा, उमरा, हलखेडा या गावांचे तालुक्यापासून अंतर सुमारे ६० किमी आहे. या गावात तसेच कुऱ्हा वढोदा परिसराला लागून असलेल्या इतर ३० गावांमध्ये रहदारीची साधने कमी आहे. त्यामुळे या भागातील कोरोना रुग्णांना व इतर आजारांच्या रुग्णांना तालुक्याच्या किंवा जिल्हयाच्या ठिकाणी रूग्णालयापर्यंत पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे एखाद्यावेळी रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. हि वेळ टाळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून कुऱ्हा काकोडा वढोदा परिसरासाठी अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी तसेच गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले असल्यामुळे लॉकडाऊन लागले आहे. त्यामुळे दळणवळणाची साधने बंद आहेत. अशा परिस्थितीत कोरोना व्यतिरिक्त इतर आजार किंवा अपघाताने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारा साठी जवळच्या नातेवाईकांना येण्यासाठी विलंब होतो. या विलंबाच्या काळात ग्रामीण भागात शवागाराची व्यवस्था नसल्या कारणाने अंत्यसंस्कार करण्याच्या वेळेपर्यंत मयत व्यक्तीच्या शवाची निगा राखण्यास अडचणी येतात. तरी हि अडचण दूर होण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यांसाठी शवपेट्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केली. यावेळी बाजार समिती संचालक अनिल वराडे, अनिल पाटील, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, सरचिटणीस अशोक पाटील उपस्थित होते.