कुणावरही संशय नसल्याचे सुशांतच्या कुटुंबीयांनी लिहून दिले होते

 

मुंबई, वृत्तसंस्था । कुणावरही संशय नसल्याचे सुशांतच्या कुटुंबीयांनी लिहून दिले होते त्यामुळे मुंबई पोलिसांनी अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नव्हता असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘मुंबई पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देशमुख म्हणाले, “आपल्याला सांगतो की, जेव्हा सुशांत सिंहच्या वडिलांसह त्याचे सर्व कुटुंबीय इथे मुंबईला आले होते. त्यांनी स्वतः सांगितलं होतं. स्वतः लिहून दिलं होतं की, ही आत्महत्या आहे आणि आमचा कुणावरही संशय नाही, असं लिखित त्याच्या वडिलांनी दिलं होतं. त्यामुळे एफआयआर कुणावर दाखल करायचा? त्यांनी म्हटलं असतं की आम्हाला अमूक एका व्यक्तीवर संशय आहे, तर… . आणि तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. असं काही असतं तर सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या निरीक्षणात मुंबई पोलिसांबद्दल तसा उल्लेख केला असता. पण मुंबई पोलिसांनी अतिशय चांगला तपास केला, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात आहे,” असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

“सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यात आता ड्रग्ज कारवाई करण्यात आली. पण मूळ प्रश्न कायम आहे. सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्या की हत्या. याचा सीबीआयनं तातडीनं तपास करायला हवा,” असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.

Protected Content