अमळनेर प्रतिनिधी । वाळू भरण्याचा फावडा देण्याघेण्याच्या कारणावरून चौघांनी तिघांना फावडा व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना 26 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास हिंगोणे शिवारात बोरी नदीच्या पात्रात घडली दरम्यान अवैध वाळू वाहतुकीवरून ही भानगड झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
किरण रमेश कोळी यांनी फिर्याद दिली की, त्यांना 26 रोजी सकाळी त्यांचे मामे भाऊ रवींद्र कैलास कोळी यांचा फोन आला की, त्यांना बोरी नदी पात्रात फावडा देण्या घेण्यावरून ३-४ जण मारहाण करीत आहेत. त्यानुसार ते आकाश बापू कोळी यांना घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी करण महादू भिल व अर्जुन महादू भिल आणि आणखी दोघे अनोळखी हे रवींद्रला शिवीगाल करत होते. त्यावेळी करणने हातातील फावड्याने रवींद्र कोळीच्या पायावर गुडघ्यावर मारहाण केली तर अर्जुन व दोघांनी लाकडी दांडक्याने त्यांना व आकाशला हात पायावर मारहाण करून जखमी केले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रशांत वाडीले करीत आहेत तर करण महादू मोरे याने पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे . रुबजीनगरमधील किरण कोळी याने भांडण आवरायला गेलो असता लाथा व चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान टेम्पो चालक आणि वाळू भरणारे कामगार यांच्यात भांडण झाल्याची चर्चा वाळू वाहतुकदारांमध्ये सुरू होती.