बारामती (वृत्तसंस्था) सरकारमध्ये फूट पडणार नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आली आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. काही विषयांवर मतभेद असू शकतात. मात्र, महाविकास आघाडी अभेद्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजीत्ग पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, महाविकास आघाडी ही तिन्ही वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी झाली आहे. यावर पत्रकारांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, याबाबत विचारले असता एनआरसी व एनपीआरच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी जी भूमिका मांडली आहे, तीच भूमिका आम्हा सर्वांची असल्याचेही पवार यांनी सांगितले.