काही विशीष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत – माजी मंत्री खडसे यांचा आरोप

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | गेले तिस वर्ष आमदार, मंत्री असताना मतदारसंघात शांतता होती. आज काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत. महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत. आपल्याला अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यासाठी येत्या सर्व निवडणुकांमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले.

 

ते चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प स सभापती विकास पाटील, जि. प. सदस्य निलेश पाटील, माजी प. स. सभापती दशरथ कांडेलकर, राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना कांडेलकर, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील,सुभाष टोके,डॉ. बी. सी. महाजन, विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरिझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर यांनी केले.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, कुऱ्हा वढोदा परिसरावर माझे विशेष प्रेम राहिले आहे. गेल्या तिस वर्षापासून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केला. पूर्वी या परिसरात येण्यासाठी रस्ते नव्हते माझ्या प्रयत्नातुन आता प्रत्येक गावाला जाण्यासाठी तिन ते चार रस्त्यांचे निर्माण झाले आहे. या परिसरातील शेती बागाईत व्हावी यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली. लवकरच या योजनेला भरीव निधी उपलब्ध होईल. गेले तिस वर्ष मी भाजपचे काम केले. तुम्हा सर्वांच्या सोबतीने पक्षाचा विस्तार केला. परंतु काहीही गुन्हा केलेला नसताना भाजपने आपल्यावर अन्याय केला म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जे प्रेम तुम्ही गेले तिस वर्ष माझ्यावर केले ते असेच कायम राहू द्या. राहिलेले विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी सांगितले की. गेल्या तिस वर्षापासून आपण सर्व नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिलात. आता सुद्धा हि साथ अशीच कायम राहू द्या. येत्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा. आपल्या गावातून परिसरातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा. आपल्या नाथाभाऊ यांनी सुरू केलेल्या आपल्या परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी ज्याप्रमाणे जोंधनखेडा धरणासाठी निधी उपलब्ध करून दिला तसा भरीव निधी या योजनेसाठी लवकरच प्राप्त होईल. आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर विकास कामांसाठी सुद्धा निधी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. येत्या काळात जि प, प स निवडणुकामध्ये नवे जुने, गट तट न करता पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून उमेदवाराला निवडणून आणून नाथाभाऊ व पक्षाचे हात मजबूत करावे. नाथाभाऊ यांनी गेल्या तिस वर्षात मतदारसंघात सर्वांगीण विकास केला हा विकासाचा रथ पुढे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले
यावेळी रमेश खंडेलवाल, रणजित गोयनका, मनिषाताई देशमुख, पुंडलिक कपले, बाळा सोनवणे, पुरकर, विलास पुरकर, विष्णू पुरकर, पवन म्हस्के, महेश भोळे, रवींद्र दांडगे, वाल्मिक भोलानकर, सुनिता मानकर, बापू ससाणे, प्रवीण पाटील, शकील सर, बुलेस्ट्रेन भोसले,व कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content