नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससहीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. मात्र कावेबाज चीनी ड्रॅगननं पुन्हा भारतीय सीमेत शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनी सेनेनं घुसखोरी केली आहे. चीनी सैनिकांनी स्थायी निवास आणि डेपोची निर्मितीही केली आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. चीननं मोठ्या संख्येनं सीमेवर सेना तैनात केली होती.भारतीय सीमेत शिरकावही केला होता.भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना बंदीस्त केलं होतं. १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला होता. भारतीय सैनिकांनी जशाच तसं उत्तर दिलं होतं. भारताचे २० जवान शहीद झाले चीननं कित्येक महिने काहीच झालं नसल्याचा कांगावा केला. मात्र अखेर चीननंही आपले सैनिक मारले गेल्याचं जाहीर केलं. मात्र आकडा जाहीर केलेला नाही.
कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून संवेदनाही व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे कावेबाज चीननं पुन्हा एकदा सीमेवर कुरापती सुरु केल्या आहेत.