नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू यांचा समावेश आहे. इराणहून भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत आले. यानंतर ते जैसलमेरला रवाना करण्यात आले आहे.
इराणमधून आलेल्या नागरिकांची आधी तपासणी करण्यात येणार आहे. जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतत्रं कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करण्यात येईल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडलं जाईल.
इराणमधून मंगळवारी ५८ प्रवाशांना आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ४४ प्रवाशांना आणले गेलं होतं. इराणमध्ये शनिवारी करोना व्हायरसने जवळपास १०० जणांचा मृत्यू झालाय. यानुसार इराणमधील करोनामुळे मृतांची संख्या ७००पर्यंत पोहोचलीय. इराणमध्ये १३ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. पश्चिम आशियात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव इराणमध्ये झाला आहे.
इराणचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. इरानचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सल्लागारालाही करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाने दोन आठवड्यांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे. आखाती देशांमध्येही करोनाचा फैलाव होतोय.