जळगाव,प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या २९ सदस्यांनी दिलीप पोकळे यांना गटनेता निवडीची संमती दिली होती. तर भाजपतर्फे भगत बालाणी यांनी गटनेतेपदाचा दावा केला आहे. परिणामी याबाबत कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्यानेच आजची महासभा तहकूब करण्यात आल्याचे प्रतिपादन माजी महापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी केले.
नितीन लढ्ढा यांनी पुढे सांगितले की, स्वीकृत नगरसेवक व स्थायी समितीमधून निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांना नियुक्त करणे हे दोन विषय होते. या दोघी विषयांसंदर्भात कायद्याच्या तरतुदींचा आभ्यास केला तर या सदस्यांच्या निवडीच्या संदर्भात प्रत्येक पक्षाच्या गट नेत्याशी चर्चा करून बंद पाकिटात त्या त्या पक्षाच्या सदस्यांच्या नावे देण्याची पद्धत आहे. भाजपच्या सदस्यांनी अॅड. दिलीप पोकळे यांची गट नेतेपदी निवड केली होती. याबाबतचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे. त्यात भाजपच्या ५७ पैकी २९ सदस्यांनी माझी गट नेतेपदी निवड केल्याने याची नोंद घेण्यात यावी अशी मागणी अॅड. पोकळे यांनी केली होती. ही मागणी प्रलंबित आहे. याचप्रमाणे त्यांनी महापौर व मनपा आयुक्तांना आपली गट नेतापदी निवड झाल्याचे कळविले आहे. यापुढे होणाऱ्या बैठ्कामांमध्ये भाजपकडून त्यांना बोलविण्यात यावे सांगितले होते. यानुसार महापौरानी अॅड. पोकळे यांना पाचारण केले होते. भाजपचे यापूर्वीचे गट नेते भगत बालाणी व भाजपतील अन्य सदस्य यांनी भाजप गट नेतेपदी भगत बालाणी यांचीच नेमणूक झालेली असल्याचा दावा सभागृहात लावला होता. यांसंदर्भातील विभागीय आयुक्तांचे माहितीच्या अधिकारात मागविलेले पत्र त्यांनी महापौरांना दाखवून गट नेते पदी अॅड. पोकळे यांना बोलविले आहे ते चुकीचे असून कायद्याला धरून नसल्याने भगत बालाणी यांनाच बैठकीला बोलविणे अपेक्षित होते असे त्यांनी सांगितले. यात महापौर किवा शिवसेना याचा काहीएक संबंध नसून हा भाजपच्या दोन गटातील प्रश्न आहे. आज संभ्रम अवस्थेची परिस्थिती होती. कायदेशीर या गोष्टीचा निवडा होत नाही तोपर्यंत यावरती कामकाज करणे संयुक्तिक होणार नसल्याने याबाबत सभागृहात सभा तहकूब करण्याची सूचना मांडली असल्याचा दावा श्री. लढ्ढा यांनी केला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/908901210025462