जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी 1 मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी लागवड करु नये. अन्यथा गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
शेतकऱ्यांना कापुस बियाणे जरी 1 मे पासुन उपलब्ध झाली तरी बागायती कापुस लागवड 1 जुन नंतरच करावी. मे महिन्याच्या मध्यावधीत तापमान 45 अंश ते 47 अंश से. पर्यंत असते, त्यामुळे जास्त तापमानात लागवड केल्यास बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नवीन अंकुर वाळुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते व मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचप्रमाणे लवकर लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. कारण मान्सुनचा चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत सुप्ताअवस्थतेत असलेले पतंग अंडी घालतात यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. याउलट जुन महिन्यात लागवड केलेले पिक पहिल्या पाऊस होण्याच्या वेळेस वाढीच्या अवस्थेत असल्याने व पात्या फुले नसल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंगांना अंडी देण्यासाठी पिक उपलब्ध न झाल्याने ते अंडी घालु शकत नाहीत व ते नष्ट झाल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणुन जास्त तापमानाच्या विपरीत परिणाम व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन मागील दोन वर्षापासुन आपण बागायती कापसाची लागवड 1 जुन नंतर करावी अशी शिफारस करीत आहोत व त्याचे चांगले परिणाम आपल्याला मागच्या दोन हंगामामध्ये दिसुन आलेले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, पुर्व मशागत, ठिबक संचाची जोडणी इ. कामांचे चांगले नियोजन मे महिन्यात करुन 1 जुन नंतरच कापुस बियाण्यांची लागवड करावी. त्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाचेल व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. येत्या खरीप हंगामासाठी आणि स्वत:च्या चांगल्या स्वास्थासाठी सर्व शेतकरी बांधवाना कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडुन शुभेच्छा देण्यात येत असल्याचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.