कापूस प्रश्‍नावरून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक : उद्यापासून आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कापूस समस्येसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिनांक १४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून भूमिका जाहीर केली आहे. यात म्हटले आहे की,  राज्यातील शेतकरी बांधवांचा मागील वर्षाचा खरीप हंगामाचा कापूस केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे अत्यल्प दरामुळे यंदा मान्सूनचं आगमन होत असतानाही घरात पडलेला आहे, मागच्या वर्षी जो कापूस १४-१५००० हजार रु प्रतिक्विंटल दराने विकला गेला तोच कापूस यावर्षी ६५०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापारी मागत आहेत. यामुळे राज्यातील तमाम कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना केंद्र व राज्य सरकार याबाबत सातत्याने उदासीन असल्याचं चित्र आहे. कुठलीही ठोस उपाययोजना या मुद्द्यावर होताना दिसत नाहीये. यामुळे शेतकरी पुरता निराश व हतबल झालेला आहे. याखेरीज केळी उत्पादक, कांदा उत्पादक तसेच कडधान्य उत्पादक शेतकरीही मेटाकुटीला आलेला आहे.

 

यात पुढे नमूद केले आहे की,  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे याबाबत वेळोवेळी या प्रश्नांबाबत सरकारमधील मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच तहसिलदारांना निवेदने देऊन, चक्का जाम आंदोलन, रास्ता रोको करूनही याबाबत ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. गेंड्याची कातडी पांघरलेल्या व झोपेचे सोंग घेण्यार्‍या सरकारला व सरकारमधील दुव्यांना याबाबत काहीही पडलेलं नाही. याचमुळे  शेतकरी बांधवांच्या या विविध मागण्यांसाठी शेवटचा पर्याय म्हणून जळगांव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शेतकरीपुत्र रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय समोर,जळगांव येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

या उपोषणाला व शेतकर्‍यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, सरपंच तसेच पक्षाचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व तमाम शेतकरी बांधवांनी यात आपला सहभाग नोंदवावा व सरकारला आपल्या जबाबदारीचं व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन रविंद्र नाना पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. हे उपोषण १४ जून रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुरू करण्यात येणार आहे.

Protected Content