पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हैराण झाला होता व तो आज चहुबाजूंनी अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. पारोळा तालुक्यातील २०१९-२०चा खरीप हंगामातील कापूस पीक विम्याची रक्कम विमा कंपनीकडून त्वरित मिळावी व ती रक्कम व ती रक्कम शेतकऱ्यांच्या पिक कर्ज खात्यात न जमा करता शेतकऱ्यांच्या नावे बचत खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटना पारोळा यांच्यातर्फे तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील खरीप २०१९-२० कापूस उत्पादक पिक विमा पोटी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. अतिवृष्टी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच शासनाच्या निर्दशनास आले होते तशा सूचना विमा कंपनीत दिल्या गेल्या होत्या. कृषी विभागाकडून पीक पंचनामे झाले होते. परंतु, अद्याप पावेतो शेतकऱ्यांना कापूस पीक विमा मिळालेला नाही. कापूस पीक विमा लवकर मिळावा असे शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त होत आहेत. पारोळा तालुक्यात १२ हजार २९० शेतकऱ्यांनी पीक विमा सहभाग नोंदवला आहे तर एकूण १३ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर पिक विमा घेतला होता. या पिक विमा पोटी शेतकरी हिस्सा २४८२०८७५ एवढी रक्कम भरलेली आहे. पीक विम्याची संरक्षित रक्कम ४९६४१७५०० रुपये एवढी आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम संपूर्णपणे वाया गेला होता. ३१ मार्चपर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावयास हवी होती असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, संघटनेचे प्रवक्ते प्रा. भिकनराव पाटील उपस्थित होते.