नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे असेल तर नेता नव्हे तर पक्षात रूजलेली पंचतारांकीत संस्कृती बदलण्याची मागणी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षावर टीका केली होती. यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा भाष्य केले. ते. म्हणाले की, आमच्या पक्षातील नेत्यांची समस्या ही आहे की ते ज्यावेळी त्यांना तिकीट मिळते त्यानंतर ते पहिल्यांदा पंचतारांकित हॉटेल बुक करतात त्यातही डिलक्स रुमची मागणी असते. त्यानंतर ते वातानुकूलीत गाडीतूनच फिरतात. ते ज्या ठिकाणचा रस्ता खराब आहे त्या ठिकाणी जात नाहीत. निवडणुका पंचकारांकित हॉटेलमधून लढवता येत नाहीत. आम्हाला आमची संस्कृती बदलावी लागेल.
त्यानंतर त्यांनी सारवासारव करत फक्त नेता बदलून तुम्ही बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यात जिंकू हे म्हणणे चुकीचे आहे. हे ज्यावेळी आम्ही आमची व्यवस्था बदलू त्याचवेळी हे होईल असे विधान केले. आमच्या पक्षाची संपूर्ण व्यवस्थाच ढासळली आहे. आम्हाला ही व्यवस्था पुन्हा उभा करावी लागेल त्यानंतर ती नवी व्यवस्था आपला नेता निवडेल हेच कारगर ठरेल असे ते म्हणाले.