काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा गांधी घराण्याचे एकनिष्ठ नेते मोतीलाल व्होरा (वय ९३) यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा संसर्गदेखील झाला होता. मात्र, योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली होती. मूत्रपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, वृद्धापकाळ आणि मूत्रपिंडाचा त्रास यामुळे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे कालच व्होरा यांनी त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा केला होता.

काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोतीलाल व्होरा यांचा मोठा वाटा राहीलेला आहे. १९७२ मधील विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी मध्य प्रदेशाच्या राजकारणात प्रवेश केला. १९८३ मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. लगेच दोन वर्षांनी म्हणजेच १९८५ साली त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केंद्रीय राजकारणाकडे वळवला आणि १९९८ च्या लोकसभेमध्ये राजनांदगाव या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. गांधी घराण्याचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती.

Protected Content