जळगाव, प्रतिनिधी । कवितेचं अधिराज्य जगावर आहे. ज्याच्या मनात कवितेचं गाणं गुणगुणतं असत ते कवीच असतात. कविता प्रत्येकाचा श्वास आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राथमिक उप संचालक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.
जागतिक कवी दिनाच्या औचित्याने रविवार दि.२१ मार्च रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व महात्मा ज्योतिबा फुले साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन घेण्यात आलेल्या कविसंमेलनात मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थानावरून हिंगोणेकर बोलत होते.
त्यांनी ‘काल प्रवाहात’ व ‘कविते’ या कवितांमधून काव्य सृजनातील कवीची भावनिक आंदोलनं कृतज्ञतापूर्वक रेखाटली. ज्येष्ठ बालसाहित्यिका सौ.माया धुप्पड यांनी ‘रक्तात मिसळली कविता’ ही आशय संपन्न कविता सादर केली. अँड.विलास मोरे यांनी ‘आई’ कवितेचे गायन करुन आईच्या वात्सल्याचे विविध रुपे व मूल्य संस्कारांची महती सांगितली. मंजुषा शुक्ल- पाठक,(अशी असावी कविता ), कवयित्री जबीन शेख ( नदी आणि मी ),संध्या भोळे ( कविता तुझ्यासवे ),युवराज सुरळकर ( माता सावित्रीला स्मरून ), मनिषा पाटील (आयुष्याचं पुस्तक,शब्दरंग ),छाया पवार पाटील ( संतांचा महिमा,कोरोनाची टेस्ट ), विजय लुल्हे (आस्वादाच्या अरण्यात ),सुनिता पाटील ( विणू कवितेचे जाळे ),सुनिल दाभाडे(चिडीया तुम कहाँ हो ), ज्योती राणे ( शब्दगंध ) कविता सादर केल्या.
‘शाळेला सुट्टी लागली रे’ या बाल काव्य संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे राज्य पुरस्कार प्राप्त कवी अँड. विलास मोरे ( एरंडोल ) यांचा साहित्यिक परिचय पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी करून दिला. एरंडोलकर बाल साहित्यिक तथा तहसिलदार आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या बालकथा संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्या प्रित्यर्थ त्यांचे समुहातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास राज्य पुरस्कृत कवी अशोक सोनवणे (चोपडा ),ज्येष्ठ कवी तथा आकाशवाणी जळगाव निवृत्त केंद्र निदेशक कवी भगवान भटकर यांनी आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास डिगंबर कट्यारे,सौ.उषा सोनार,बंजारा भाषा अभ्यासिका वैशाली नांद्रे (पारोळा ), यांसह जळगाव व पाचोरा भिशी सभासदांनी कवि संमेलनाचा बहुसंख्येने घेतला.कार्यक्रमास निवृत्त डायट प्राचार्य नीळकंठ गायकवाड,निवृत्त माध्यमिक उप शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,युवराज माळी (अथर्व प्रकाशन ) व सौ.संगिता माळी यांची प्रेरणा आणि पाचोरा भिशी प्रमुख सौ.अरुणा उदावंत,ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे, कवी रमेश राठोड,कवी अरुण वांद्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.आभार प्रदर्शन संयोजक विजय लुल्हे व सुत्र संचालन ज्योती राणे यांनी केले.तंत्रस्नेही सुनिल दाभाडे यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.