पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी ६० बाय ४० ची पोट्रेट रांगोळी काढल्याने त्यांची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
शैलेश कुलकर्णी यांनी मार्च महिन्यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा अक्का यांच्या वाढदिवसानिमित्त हैदराबाद येथे ६० बाय ४० फुटाची भव्य अशी पोट्रेट रांगोळी काढली होती. याच देदीप्यमान कामगिरीची नोंद महत्त्वाच्या समजल्या जाणार्या एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक नेते, अभिनेते थोर महापुरुषांचे रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब चित्र साकारले आहे.त्यांच्या या कौशल्यामुळे शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत असलेल्या कलागुणांना वाव मिळत आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची या एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल संस्थेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.