बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकमध्ये भाजपने आता सत्तांतराचे प्रयत्न थांबवल्याचे दिसून येत असल्यामुळे येथे सध्या तरी कुमारस्वामी सरकारला जीवदान मिळाल्याचे मानले जात आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने सध्या तरी कर्नाटकातील आपल्या हालचाली थांबविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमध्ये सत्ता बदल करण्यास भाजपातील पक्षश्रेष्ठी अनुकूल नाहीत. याऊलट लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- जनता दल सेक्यूलर या आघाडीवर टीका केल्यास भाजपालाच फायदा होईल, असे देखील पक्षनेतृत्वाला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षातील आमदार फोडण्यासंदर्भात पक्षनेतृत्वाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. असे प्रयत्न केल्यास लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, याची जाणीव पक्षनेतृत्वाला असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. यामुळे या राज्यात लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच सत्तारूढ होण्याचे प्रयत्न केले जातील हे आता मानले जात आहे.